भावपुर्ण आदरांजली... कविवर्य नारायण सुर्वे
*गिरणगावचे सुर्वे मास्तर*
*------ कविवर्य नारायण सुर्वे*
गिरणी कामगार असलेल्या *गंगाराम सुर्वे* यांना चिंचपोकळी येथे एका फुटपाथच्या बाजूला कचरा कुंडीजवळ एक अनाथ मुलगा सापडला (१९२६). त्यांनाही मुलबाळ नसल्याने त्यांनी व पत्नी *काशीबाई* यांनी त्या अनाथ मुलाला वाढवले. *नारायण गंगाराम सुर्वे* हे नावही दिले परंतु परळ बोगद्याच्या चाळीत लहानाचा मोठा झालेल्या नारायणला अठरा विश्व दारिद्र्य, कमालीचे काबाडकष्ट तसेच जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागला.
नारायणला लिहिता वाचता यावे म्हणून महानगरपालिकेच्या शाळेत घातले.
*गंगाराम सुर्वे* हे मूळचे कोकणातील हेताची वाडी (भुईबावडा) येथील होते. गिरणीतून निवृत्त झाल्यावर (१९३६) नारायणच्या हातावर दहा रुपये ठेवून ते आपल्या गावी निघून गेले. त्यावेळी नारायण नुकताच चौथी पास झाला होता (वय वर्ष १०).आता नारायण पुन्हा एकदा या जगात अनाथ झाला.
आता टीचभर पोटासाठी *भाकरीचा चतकोर चंद्र* (भाकरीचा चंद्र हे त्यांच्या एका गाजलेल्या कवितेचे नाव आहे) मिळवण्यासाठी त्यांनी एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलमध्ये कपबशा विसळणे, कधी कोणाचे कुत्रे तर कधी कोणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, घरोघरी दूध टाकणे, कारखान्यात पत्रे उचलणे, टाटा ऑइलमिल मध्ये हमालीकाम अशी छोटी मोठी कामे करत जीवनाचा संघर्ष चालू ठेवला. नंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत शिपाई म्हणून नोकरी लागली. नोकरी करता करताच ते सातवी उत्तीर्ण झाले व महानगरपालिकेच्या नायगाव नंबर-१ शाळेत ते शिपायाचे शिक्षक (१९६१) झाले. तेव्हापासून ते अख्ख्या गिरणगावचेच मास्तर झाले.
सुर्वें यांच्या साम्यवादाची बांधिलकी डाव्या विचार प्रणालीची जोडणारी होती. त्यातून ते कम्युनिस्ट चळवळीकडे ओढले गेले. तशातच चळवळीतील एक साथी *कॉम्रेड तळेकर* यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले आणि आईबापाविना वाढलेल्या *कृष्णा साळुंखे* यांच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खार जवळ एका झोपडपट्टीत त्यांनी आपला संसार थाटला. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असताना ते राहत असलेले झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवता, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य सुर्वे यांनी केले. जीवनात जे जे अनुभवले त्याचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात.
पदपथापासून विद्यापीठापर्यंत, कामगारां पासून बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली.
संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले होते आणि कबीर दोहे करायला लागला तद्वत मी कविता करायला लागलो. त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही. असे ते मोठ्या अभिमानाने म्हणत.
त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये नवयुग मासिकात प्रसिद्ध झाली. कधी दोन देत कधी दोन घेत जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्य प्रांतात नवा सूर घुमवला.
१९६२ साली त्यांचा पहिला कवितासंग्रह *ऐसा गा मी ब्रह्म* प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांची एका मागोमाग एक काव्यसंग्रह येत राहिले, गाजत राहिले. *माझे विद्यापीठ* (१९६६) , *जाहीरनामा* (१९७५) , *नव्या माणसाचे आगमन*, *नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता, *सनद* हे त्यांचे तीन कवितासंग्रह एकाचवेळी (१९८२) प्रसिद्ध झाले.
नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हाणम्या, इसल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकवणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंच्या निधनामुळे धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या, अशी अनेक व्यक्तीचित्र त्यांनी अत्यंत समर्पक व रेखीवपणे उभी केली.
त्यांचे पहिले काव्यवाचन *कुसुमाग्रजां* च्या अध्यक्षतेखाली भरलेल्या *मडगाव* च्या साहित्य संमेलनात झाले.
*मास्तर तुमचंच नाव लिवा, मर्ढेकर*,
*असं पत्रात लिवा, सर कर एकेक गड, मनीऑर्डर, मुंबईची लावणी* या त्यांच्या गाजलेल्या काही निवडक रचना.
त्यांच्या कवितेत उच्चनीचता, ईश्वरवाद, प्रारब्ध, किंवा जातीपातीचा उल्लेख कधीही आढळला नाही. संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षाचे चित्रण व पुरोगामी विचारांच्या मुशीतून तयार झालेली सामाजिक बांधिलकी याचा आशय त्यांच्या कवितेतून जाणवतो.
ज्या वंचिता बद्दल त्यांनी लिहिलं, त्यांची सगळी दुःख अनुभवली.*भाकरीचा चंद्र* या कवितेत त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते.
*कामगार आहे मी, तळपती तलवार आहे*.
*सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे* असे म्हणत प्रस्थापितांनाच आव्हान दिले होते.
एकदा एक चोराने त्यांच्या घरात चोरी केल्यानंतर त्या घरात नारायण सुर्वे यांचा फोटो पाहून एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या घरी आपण चोरी केली याचा पश्चाताप होऊन चोरलेले सर्व सामान परत केले व कागदावर माफीनामा लिहून चूकीची कबूली दिली होती.(ही घटना नारायण सुर्वे यांच्या मृत्यूनंतरची असून त्यावेळी त्यांची कन्या व जावई रहात होते.)
अशाच प्रकारच्या चोरीचा किस्सा पु.लं.च्या बाबतीतही घडला होता.
ज्यांना ज्यांना सुर्वे दिसून आले नाहीत अशांसाठी एकदा *पु.ल*. म्हणाले होते, "अरे *केशवसुत* कुठे व कशाला शोधताय ? तुमचा केशवसुत परळ मध्येच तर राहतोय."
त्यांच्या कवितांचे अनेक भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या कवितेचा चाहता वर्ग आहे. कवितेबरोबरच सुरुवातीला त्यांनी गाणी लिहिली. *शाहीर अण्णा भाऊ साठे,* *शाहीर अमर शेख,* *शाहीर गवाणकर* यांच्याबरोबर कलापथकात वावरताना झालेल्या संस्काराने प्रेरित होऊन १९५६ मध्ये त्यांनी *डोंगरी शेतं माझं गं, मी बेणू किती* हे अजरामर गीत तर लिहिलेच पण HMV ने त्या गीताची कॅसेटही काढली. स्त्रीच्या कष्टांचा आणि वेदनेचा हुंकार त्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवला. त्यासाठी *शाहीर अमर शेख* यांनी या गीताला खेडोपाडीच नव्हे तर घराघरात पोहोचवले. हे लोकप्रिय गाणे सभा संमेलनातच नव्हे तर तमाशाचे खेळामध्येही गायले जाई.
पुढे त्यांनी *गिरणीची लावणी,* *महाराष्ट्राच्या नावानं* हा गोंधळ, *गाडी आणा बुरख्याची, दोन चाकांची* या गीतासह सुमारे १५--२० गीते लिहिली. यातील आठ गीते *ऐसा गा मी ब्रह्म* मध्ये आहेत.
आपला पिंड गीतकाराचा नाही हे ओळखून त्यांनी कवितेवरच आपले लक्ष केंद्रित केले.
*कविता श्रमाची* व *गाणी चळवळीचे* हे त्यांनी संपादित केलेले दोन गीतसंग्रह आहेत.
अनेक मोठे पुरस्कार, मानसन्मान, शिष्यवृत्ती व गौरव वृत्ती मिळाल्यानंतरही हा माणूस हवेत न जाता जमिनीवरच राहिला.
*नारायण सुर्वेंना मिळालेले पुरस्कार*
🟣 कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
(२००४)
🟢 मध्य प्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
🟣 भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (१९९८)
🟢 सोव्हिएत रशिया-- नेहरू अवॉर्ड
🟣 नरसिंह मेहता पुरस्कार- महाराष्ट्र राज्य
साहित्य व सांस्कृतिक मंडळ
🟢 कराड साहित्य पुरस्कार
🟣 महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार
🟢 परभणी येथे (१९९५) भरलेल्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
,*नारायण सुर्वे कला अकादमी* तर्फे *पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार* दरवर्षी देण्यात येतो.
💐 *सुर्वेंच्या काव्याची इहवादी समीक्षा*
(ले.डाॅ. श्रीपाल सबनीस)
💐 *मास्तरांची सावली* ( ले. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचे मास्तरांच्या आठवणी असलेले आत्मकथन) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आपल्या पश्चात मास्तरांचे हाल होऊ नयेत म्हणून आपल्या आधी देवाने मास्तरांना न्यावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करणाऱ्या कृष्णाबाईंची हाक परमेश्वरालाही ऐकावी लागली. १६ ऑगस्ट २०१० वयाच्या ८४ या वर्षी ठाणे येथे त्यांचे निधन झाले.
अशा या महान साहित्ययात्रीला ही
💐 *भावपूर्ण आदरांजली* 💐
Comments
Post a Comment